निसर्गाच्या सांस्कृतिक खुणा जपणारी स्मृतिचित्रे
- दीपक घारे
चित्रा वैद्य सर्वांना माहीत आहेत त्या मुख्यतः निसर्गचित्रकार म्हणून. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेऊन चित्रकार एम. के. केळकर यांच्याकडे त्या निसर्गचित्रणाच तंत्र शिकल्या. महाराष्ट्रात निसर्गचित्रांची परंपरा आहे. त्या परंपरेत बसतील अशीच त्यांची निसर्गचित्रे आहेत. पाश्चात्यकला जाणून घेण्यासाठी चित्रकारांच्या एका ग्रुपबरोबर त्या युरोपला जाऊन आल्या आणि नंतर त्यांच्या कामात लक्षणीय बदल झाला. चित्रातले मूलभूत घटक, त्यांची मांडणी, रंगाचे माध्यम याबद्दल त्या अधिक सजग आणि प्रयोगशील झाल्या.
त्यांच्या चित्रांचे हे नवे प्रदर्शन त्यांच्या या नव्या दृश्य-जाणिवेचा नेत्रसुखद प्रत्यय देते. प्रदर्शनाचं नाव आहे, ‘कॉल ऑफ द हिल्स’. प्रदर्शनाची मूळ कल्पना आर्ट इंडिया फाऊंडेशनचे मिलिंद साठे यांची. हिल स्टेशन्स किंवा थंड हवेच्या ठिकाणांना आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान आहे. एकीकडे मुक्त निसर्गाचा, निरभ्र आकाशाचा आणि चित्तवृत्ती प्रसन्न करणा-या सुखद हवामानाचा अनुभव तर दुसरीकडे या हिल्स स्टेशन्सना वेगळी ओळख देणा-या इमारती, ब्रिटिशांनी दिलेल्या वासाहतिक वारशाच्या खुणा यातून एक वेगळंच वातावरण तयार होतं. त्यात पुन्हा व्यक्तिगत आठवणी या प्रवासाशी जोडल्या गेल्या तर त्याला स्मरणरंजनात्मक असं रूप येतं ते वेगळंच. हा सारा अनुभव चित्रा वैद्य यांनी चित्रांच्या माध्यमातून जिवंतपणे व्यक्त केला आहे.
जलरंग आणि ऍक्रिलिकमध्ये केलेली ही चित्रं आहेत. त्यात माध्यमाची विशुद्धता जपणारी जलरंगातील चित्रं आहेत, तशीच ऍक्रिलिकमधील जाड रंगलेपन असलेली, आकार आणि रंगाच्या माध्यमातून तरल भाव अथवा मूड टिपणारी चित्रंही आहेत. पर्वतरांगा, इमारतींचे दरवाजे आणि नक्षीदार फर्निचर यांचं वास्तवातलं अस्तित्व आणि अनुभवांनी संस्कारित झालेली त्यांची स्मृतिरूपं यांचं मनोज्ञ मिश्रण या प्रदर्शनातल्या काही चित्रांमधून आढळतं. विशेष म्हणजे या चित्रांमध्ये कुठेही मनुष्याकृती नाही, तरीही माणसाचं संवेदनशील मन आणि त्याचं अस्तित्व या चित्रांमधून जाणवत राहतं.
इथे दोन प्रकारची चित्रं आहेत. निखळ निसर्गमानवी संस्कारांपासून मुक्त अशा पर्वतरांगा, वृक्ष वगैरे. हा एक प्रकार झाला. दुस-या प्रकारच्या चित्रांमध्ये वास्तुरचनेच्या झरोक्यातून उमटलेल्या, संस्कारित झालेल्या, मानवी भावनांशी जवळीक साधणा-या निसर्गखुणांचा अनुभव येतो. पहिल्या प्रकारच्या चित्रांमध्ये परिचित निसर्गचित्रणपद्धतीच वापरलेली आहे. त्यातलं विस्तीर्ण अवकाश, खोलीचा त्रिमितीपूर्ण आभास या शैलीचा प्रत्यय देणारा आहे. पण या चित्रांमधल्या रंगाच्या वापरामुळे त्याला एख वेगळेपणा आलेला आहे. लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या रंगांचा वापर एक्स्प्रेशनिस्ट पद्धतीने करण्यात आलेला आहे. त्यात वास्तवातल्या रंगांपेक्षा मनात उमटलेल्या रंगतरंगाचा प्रभाव अधिक आहे. एका चित्रात हिरव्या पायवाटेपासून तपकिरी, जांभळ्या, फिकट निळ्या पर्वतराजींचे आणि पिवळसर हिरव्या रंगाच्या विविध छटा दाखवणा-या शेताच्या चार रांगा क्षितिजापर्यंत दाखवलेल्या आहेत आणि या रांगांना विभागणा-या लाल, नारिंगी, जांभळ्या फुलांच्या समांतर रेषाही आहेत. क्षितिजावर एका बाजूला पश्चिमरंग उजळणारं आणु दुस-या बादूला अंधारत जाणारं आखआश दाखवलं आहे. या सा-या रंग आणि आकारांच्या मांडणीतून एक वेगळंच गूढ आणि मोहक वातावरण तयार होतं.
दुस-या प्रकारच्या चित्रांमध्ये ब्रिटिशांचा वारसा सांगणा-या वास्तूंचे चित्रण आहे. हिल स्टेशन्सची अतिथीगृहे, होटेल्स, चर्चेस यांनाही एक स्वतंत्र ओळख आहे. एकूण वातावरण निर्मितीत या वास्तूंचाही मोठा वाटा आहे. चित्रा वैद्य यांनी आपल्या चित्रांमधून काही दरवाजे, इमारतीचे प्रवेशद्वार, खिडक्या, अंतर्भागातले फर्निचर यांचा वापर केला आहे. हा वासाहतिक वारसा आता केवळ इतिहासाच्या स्मृतिखुणा म्हणून शिल्लक राहिला आहे. या चित्रांमधले दरवाजे, खिडक्या यांच्यावर गोथिक वास्तुशैलीचा प्रभाव दिसतो. दाराच्या वर त्रिकोणी, दोन्ही बाजूला उतरतं छप्पर, दारांच्या, खिडक्यांच्या टोकदार कमानी, रंगीत काचा म्हणजेच स्टेन्ड ग्लासच्या त्रिकोण, चौकोनाच्या भौमितिक आकारांमधून ही चित्रं तयार झालेली आहेत. एखाद्या चित्रात निळ्या-करड्या रंगछटांमध्ये रंगवलेलं इमारतीचं प्रवेशद्वर, भौमितिक आकार आणि थंडीत गोठलेल्या उदासपणाला गतिमान करणारी दारावरच्या गोल खिडकीतली इल पॅलान्झो ही अक्षरे दिसतात तर दुस-या एका चित्रात गोथिक कमानींचा पोर्टिकोसारखा दिसणारा भाग आणि त्यावर रेंगाळलेला सायंकालीन उन्हाचा मंद प्रकाश दिसतो. लाल दगडी भिंत आणि त्यात उभट आकाराची कॅनव्हास व्यापून टाकणारी निळ्या-काळ्या रंगातली महिरपीची खिडकी, काचेच्या तावदानांवर पडलेले झाडाच्या फांद्यांचे प्रतिबिंब चित्राला एक वेगळाच गूढ अर्थ देतात.
आणखी एक निसर्गचित्र त्यातल्या आकारांच्या रचनेमुळे लक्ष वेधून घेतं. जलरंगातलं तसं हे नेहमीच्याच शैलीतलं चित्र आहे. पण जिन्याचे कठडे आणि पाय-या, त्यावर सावली धरणा-या कौलारू छपरांचे आकार आणि भोवतालची झाडांची हिरवळ यातून एक मनोज्ञ आकृतिबंध तयार होतो.
थोडक्यात सांगायच ‘कॉल ऑफ द हिल्स प्रदर्शन तुमच्या स्मृतिकोषातल्या निसर्गप्रतिमांना साद घालतं आणि एक वेगळा दृश्य अनुभव तुमच्या पुढे ठेवतं.
For English version of article, click here